Wednesday, October 15, 2008

कित्येक

कित्येक दिवस झाले तरी
स्वीनीचा फ़ोन आला नाही
बरेच दिवस निघून गेल्यावर
मी - माझ्या आठवणींसकट परागंदा -

माझा तसाही काय उपयोग तिला ?
आणी तिचा मलाही ?

मी मलाच अडकून राहिलोय
कॉफीच्या कपाखालच्या निरुपयोगी पोकळीसारखा
हिरव्या स्वच्छा काचेवर पडलेल्या
गोंदाच्या थेम्बावरील धुळीसारखा

मी अडकून राहिलोय
Flying Insect Catching मशीनमध्ये

इथला जाम्भळा प्रकाश जाळतही नाही

मी बस चिकटून आहे

स्वीनीचे पूवॅज
पेलोपोनेशियन युद्धापासून
बराच खडतर प्रवास करत
तिच्या आयुष्यात घुसले
ज्यांचा तिला काहीच उपयोग नाही

स्वीनी अज्ञान आहे
कायमची अपात्र

स्वीनीला ज्ञानापासून दूर ठेवणे -
स्वीनीला मृत्युपासून मुक्त करणे -
हे माझ्या शक्तीपलीकडे आहे

तिचा फ़ोन येत नाही
तिचा फ़ोन लागत नाही

ती कुठे अडकून पडलीये कोण जाणे ?
मी कुठली हेल्पलाइन वापरू ?
मला कुठे मिळेल का तिचा पत्ता ?
ठावठिकाणा ?

ती ओळखेल का मला गर्दीत ?

स्वीनी -

तिच्या डाव्या मनगटावर तीळ आहे
आणि डाव्या मेंदूत माझ्या काही आठवणी

जर ह्या प्रकाशाच्या पकडीतून सुटलो तर
स्वीनी मी तुझा जरुर शोध घेइन

मी इथे अडकून आहे

मला सुटायचय


ॐकार कुळकर्णी






Saturday, October 11, 2008

तलाव साचून



तलाव साचून गार हीरवळ
त्याच्या मनात उतरायला लागली
त्या मोसमात
तुझे काहीच का नुकसान झाले नसेल,
माझ्यावर काळ उधळून टाकल्याच्या
अक्षम्य अपराधामोबदल्यात ?


खडबडीत भूमीला गर्भार थेम्ब
मिळतात तसे,
रोवत नाहीत ते
अभाळाच्या देवाच्या
प्रकाशाचे अंकुर
उत्फुल्ल नेणीवेच्या डोहात ?

श्रावणात बरसतो दिमाखदार
पण वर्षातल्या त्याही कोरड्या
आभाळात
आठवतील का ग तुला हे
रोजच्याच आभाळात
दाटीवाटी करणारे
काळे पोटुशे मेघ ?

_______________-______________







Friday, October 10, 2008

वहीतून अमानुषपण

वहीतून अमानुषपणे
फाडून काढलेल्या
पानाची अव्यवस्थित बाजु
झालाय माझा आजचा दीवस

भींतीला कान लावून
चिकटून उभा आहे विलंब

वीटांच्या खाचेतून जन्माला आलेली
एक मलूल डहाळी
अदृश्य आहे

प्रकाश यायचा आहे

मी पाठ्ही केले आहे
संश्लेषणाचे संद्न्या सूत्र

मग कुठुनसा येतो आहे
हा वाळत चाललेल्या
बुरशिचा
हिरवट गंध ?
आणि ओल्या थेम्बंआच्या
मेत्रोनोमचा ध्वनी ?

___________________