Wednesday, October 15, 2008

कित्येक

कित्येक दिवस झाले तरी
स्वीनीचा फ़ोन आला नाही
बरेच दिवस निघून गेल्यावर
मी - माझ्या आठवणींसकट परागंदा -

माझा तसाही काय उपयोग तिला ?
आणी तिचा मलाही ?

मी मलाच अडकून राहिलोय
कॉफीच्या कपाखालच्या निरुपयोगी पोकळीसारखा
हिरव्या स्वच्छा काचेवर पडलेल्या
गोंदाच्या थेम्बावरील धुळीसारखा

मी अडकून राहिलोय
Flying Insect Catching मशीनमध्ये

इथला जाम्भळा प्रकाश जाळतही नाही

मी बस चिकटून आहे

स्वीनीचे पूवॅज
पेलोपोनेशियन युद्धापासून
बराच खडतर प्रवास करत
तिच्या आयुष्यात घुसले
ज्यांचा तिला काहीच उपयोग नाही

स्वीनी अज्ञान आहे
कायमची अपात्र

स्वीनीला ज्ञानापासून दूर ठेवणे -
स्वीनीला मृत्युपासून मुक्त करणे -
हे माझ्या शक्तीपलीकडे आहे

तिचा फ़ोन येत नाही
तिचा फ़ोन लागत नाही

ती कुठे अडकून पडलीये कोण जाणे ?
मी कुठली हेल्पलाइन वापरू ?
मला कुठे मिळेल का तिचा पत्ता ?
ठावठिकाणा ?

ती ओळखेल का मला गर्दीत ?

स्वीनी -

तिच्या डाव्या मनगटावर तीळ आहे
आणि डाव्या मेंदूत माझ्या काही आठवणी

जर ह्या प्रकाशाच्या पकडीतून सुटलो तर
स्वीनी मी तुझा जरुर शोध घेइन

मी इथे अडकून आहे

मला सुटायचय


ॐकार कुळकर्णी






No comments: