My article on AISI AKSHARE and the thread below.
अपग्रेड प्रेम
लेखक/लेखिका: वंकू कुमार (Sun, 11/11/2012 - 21:34)
मी वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रेम करत आलो आहे असं म्हणालो तर इतर कुणाच्या आधी मीच ते खोडून काढेन. म्हणजे एका मुलीच्या आणि माझ्या शरीरा-मनामधल्या काही घटना मी प्रेम या एका मोठ्या कॅटेगरीत टाकल्या, त्या वेळेच्या माझ्या भावनांबद्दल असलेल्या माझ्या आताच्या भावना शब्दांनी रि-घडवल्या तरी त्यानी व्याख्येसारखं प्रेम समोर ठेवता तर काही येत नाही. त्यावेळी प्रेम नावाची गोष्ट सिनेमात दिसायची, शरीरातलं प्रेम हे अनोळख्याप्रमाणे स्वतःचं स्वतः मुक्त जगायचं. आणि आता मोठं झाल्यावर या प्रेमाला मी अनुभवण्याची, त्याचे नियम आणि एटीकेट सांभाळण्याची जबाबदारी असते हे कळतंय एवढाच या दोन स्थितींमधला फरक आहे. शाळेत प्रत्येक इयत्तेनुसार हे प्रेम बदलत जायचं तेव्हा मेंदूचा एकेक पीळ मच्युअर झाल्यासारखं वाटायचं. आणि स्वतःच्या बरोबरीनं काही इतर पात्रंसुध्दा प्रेमात बुद्धिबळातल्या सोंगट्यांसारखी कशी पळवावी लागतात याचं शिक्षण मिळायचं. गाण्यांमधून, शिक्षणातून, सिनेमातून, कवितेतून, साहित्यातून आणि जमेल तितक्या सर्व स्रोतांतून भडिमार व्हायचा की जगातली सगळ्यात शाश्वत आणि माणुसकीचा तरणोपाय असलेली गोष्टंय प्रेम. ते मिळतं तेव्हा इतर कशाची गरज उरत नाही. त्याच्यापुढे सगळं काही गौण भासू लागतं. लोक लोकांना फाट्यावर मारतात किंवा कंप्लीटली मारतात किंवा स्वतःला मारतात आणि कोणत्याही पातळीवर जाऊन प्रेम करण्यात यशस्वी होतात. प्रेम हे एक शाश्वत आणि सुखकारी मूल्य आहे या कॉन्स्ट्रक्टलाच धक्का लागलेला मी पाहिला नाही कधी. कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रेमाचं वर्चस्व आपल्या शाश्वतीसुखलोलुप मनांनी मान्य केलेलंच असतं. मी जेव्हा या प्रेमानं मिळणाऱ्या शाश्वतीचा आणि सुखाचा विचार करतो तेव्हा माझ्या मनावर या शाश्वतीसुखाचा कोणताच अक्ष तयार नसतो.
साधारणपणे एकाच प्रकारचं प्रेम अस्तित्वात नसतं याविषयी बरेच लोक बोलताना आढळतात. मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, पती/पत्नी प्रेम, देशप्रेम, राष्ट्रप्रेम, विश्वप्रेम अशी अनेक प्रेमं कव्हरेज मिळवतात. पण एकाच उपप्रकारातलं प्रेम किती टप्प्याटप्प्यांनी किती प्रमाणात कमालीचं बदलतं याचा कधी धांडोळा घेतला तर हे लक्षात येईल की प्रेम ही अज्जिबात शाश्वत आणि सेक्रिड गोष्ट नाही. इंटेग्रिटी हा प्रेमातला अतिशय वरवरचा भाग आहे. (इथे सार्वजनिक जीवनात वर्षानुवर्षं एकमेकांची साथ देणाऱ्या जोडीदारांची उदाहरणं गैरलागू ठरतात.) ही इंटेग्रिटी स्वतःची. ती जेव्हा स्वतःच्या सीमा ओलांडून बाहेर जाते तेव्हा तिचं पावित्र्य किंवा या संदर्भात व्हर्जिनिटी भंग पावते. आईवडील किंवा बहीणभावाविषयीचं प्रेम हे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कमीजास्त किंवा निर्माण-नष्ट होत जातं. बालपणी ते परावलंबित्वातून आणि त्यामुळे झालेल्या सवयीतून येत असेल, समज आल्यानंतर स्वार्थ सुरक्षित करण्यातून असेल आणि प्रौढ किंवा अतिप्रौढ वयात कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणीवेतून आलेलं असेल. पण ज्यात रतिक्रीडेचा आनंद वगळला आहे ते प्रेम या प्रकारच्या कार्यकारणभावाची ओझी वाहतच असतं. त्यामुळे निष्काम कर्मयोगाप्रमाणेच निःस्वार्थ प्रेम हीसुध्दा एक आदर्श संकल्पना ठरते. कोणत्याही गोष्टीची कामना नसलेल्या माणसाला निष्काम असण्याची कामना असतेच त्याचप्रमाणे निःस्वार्थ प्रेम करणाराही अशा प्रेमातून मिळालेल्या आनंदाची अभिलाषा करत असतो. सार्वजनिक जीवनात समाजकार्यात एकमेकांची मनोभावे निःस्वार्थीपणे साथ देणाऱ्यांची ती तशी देण्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. प्रेम ही एकच गोष्ट त्यात क्रुशल नसते. आपल्या सामाजिकतेचे भान, आपल्या कार्याप्रती निष्ठा आणि ते निरंतर चालू राहावं यासाठीची तजवीज अशी अनेक कारणं त्यात असू शकतात.
सेक्स इन्व्हॉल्व्ह असलेल्या प्रेमाच्या बाबतीत इंटेग्रिटी हा शब्द जास्त वजनदार होतो. ज्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटतं त्याच्याशी आपण सेक्शुअल होतो. या वाक्याला उलट केलं तर ज्या व्यक्तीशी आपण सेक्शुअल होतो तिच्याविषयी आपल्याला प्रेम वाटत असतं. हे विधान सर्वसाधारण समाजाच्या बाबतीत आणि शरीरसंबंधांचे संस्थात्मक नियमन करण्याच्या प्रक्रियेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आता हेच विधान आपण व्यक्तीच्या पातळीवर नेलं तर काय होतं ते बघू. ''मी'' ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्यासोबत ''मी'' सेक्स करतो. याउलट ''मी'' सेक्स करतो त्या मुलीवर मी प्रेम करतोच असं नाही. मग मी ज्या मुलीवर ''प्रेम'' करतो तिच्या शरीराशिवाय मला आणखी काय हवं असतं? तिचा वेळ, लक्ष्य, सुख, सद्भावना, स्तुती, मदत, आधार, समज, मार्गदर्शन, अहंचं शमन, प्रजोत्पादन इ. या सगळ्या गोष्टी कमीअधिक प्रमाणात जी मला देते तिच्यावर मी प्रेम करतो. यात कुठेही काळ या घटकाचा उल्लेख नाही. पण काळच या सगळ्या सिच्युएशनमधला सगळ्यात क्रुशल घटक आहे. वयाच्या २४ व्या वर्षी प्रेम करणारं एक कपल सेक्सशिवायच्या स्वतःच्या ज्या गरजा भागवतं तेच कपल वयाच्या ४५ व्या वर्षी त्या भागवेलच असं नाही. मी जो २४ व्या वर्षी ३४ साईझची जीन्स घालत असतो तोच मी ४५ व्या वर्षी ३८ साईझची पँट पोट दाबून अंगावर चढवत असतो. याचाच अर्थ मी बदललेला असतो आणि त्यात 'मी'चा काहीएक दोष नसतो. अशा बदललेल्या परिस्थितीत आपल्याला एकमेकांची गरज उरली नाही हे सत्य आपल्या गळ्याखाली उतरत नाही. आपण एकमेकांच्या इतके जवळचे आहोत कारण आपण इतकी वर्ष एकमेकांसोबत झोपलो आहोत. त्यामुळे आपल्याला एकमेकांची जरी गरज नसली तरी आपण एकमेकांसोबत थांबलं पाहिजे कारण डिव्होर्स घेण्याइतके आपले संबंध बिघडले नाहीत अशी एक लांबलचक कारणमीमांसा आपल्याला अवगत होते. खरंतर गरजच नसेल तर एकमेकांवर प्रेम करण्याचं काही कारणच उरत नाही. प्रेमाचं पासिंग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लोक हे सहजासहजी विसरुन जातात की हे फक्त लायसेन्स आहे प्रत्यक्ष सवारी आपणच आहोत. प्रेम मिळवण्यासाठी जेवढी धडपड कोर्टिंगच्या काळात एखादी व्यक्ती करते तीच व्यक्ती एकदा ते प्रेम मिळून उपभोगल्यानंतर शांत होते. त्यामुळे कितीही कडू वाटलं तरी बऱ्याच कपल्समध्ये ही ''गरज सरो वैद्य मरो''ची अवस्था येते हे सत्य आहे. लग्नसंबंधात ही मानसिक गरजांची यादी ऐहिक उपभोगात रुपांतरित होते. आणि त्यासाठी तरी सहजीवन मुकाट्यानं स्वीकारलं जातं.
''लग्नाआधी तू मला रोज एक गुलाबाचं फूल द्यायचास'' किंवा ''आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी दीड तास फोनवर बोलायचो'' ही अवस्थासुध्दा पुढे सरकणाऱ्या काळाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीतून येत असते. आपल्या वाढीच्या वेगाच्या समप्रमाणात आपल्या प्रेमाच्या गरजेचं सुध्दा अपग्रेडेशन करायला लागतं हे समजायला हवं. एक व्यक्ती म्हणून एकमेकांना समृध्द करु शकत नसले तरीही सगळ्या सुखदुःखात एकमेकांची साथ देण्याच्या अट्टाहासापायी एकमेकांच्या सोबत राहून आणि असमाधानानं गोंधळल्यामुळे आयुष्य नासवून टाकणारी जोडपी मी बघितली आहेत. त्यापेक्षा दूर होणं हा जास्त समजूतदारीचा आणि सर्जक उपाय ठरावा. 'Scent of a woman' नावाच्या एका अमेरिकन फिल्ममध्ये अल पचिनोच्या तोंडी एक वाक्य आहे. "I hate goodbyes". तसंच आपल्याला गुडबाईज विषयी मनात तिरस्कार असतो. आपल्या आयुष्यात असलेली पोकळी एक व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वानं जन्मभर कधीच भरून काढू शकत नाही. फार फार तर ती आपली पोकळी समजून घेऊ शकते आणि ती भरून न काढण्याचा सुज्ञ निर्णय घेऊ शकते. पण आपल्याला हट्टानं एकमेकांचे आणि स्वतःचे लाड करून घ्यायचे असतात. अट्टाहासानं दुसऱ्याचं एकटेपण घालवायचं असतं. आणि या अट्टाहासापायी दोन माणसांतलं अंतर इतक्या निर्घृणपणे वायोलेट केलं जातं की एकमेकांविषयी प्रेम वाटण्याऐवजी घृणा आणि तटस्थता निर्माण होते.
ज्या प्रकारच्या काळात आपण राहत आहोत त्यात व्यक्तीच्या स्वच्या तुटक तुटक संज्ञा एकमेकांशी एका सैल दोऱ्याने बांधल्या गेल्यासारख्या दिसतात. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारी व्यक्ती ऑफिसमध्ये सेक्युलर असते तर दिवाळीला पारंपरिक सण एन्जॉय करणारी. संघाच्या वातावरणात वाढलेला दिग्दर्शक सोशलीस्ट सी. ए. शी कॉन्ग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या प्रचारासाठी फिल्म्स बनवण्याचे मनसुबे आखत असतो. पर्यावरणावर हिरिरीनं भांडणारे एका पॉईंटनंतर प्लास्टिकच्याच पिशव्यांत प्रचाराचं सामान घेऊन जातात. हे आंतरविरोधांचे नमुने ज्याप्रमाणे दोन विरुद्ध टोकाची मतं एकत्र आल्याचं दाखवतात तसंच परस्परविरोधी नसलेली पण आपलं वेगळेपण शाबूत ठेवणारी मतंही शहरी भागात एकमेकांना जास्त त्रास न देता राहताना दिसतात. प्रेमाच्या बाबतीत हे असं न-कट्टरपंथीय धोरण लोकप्रियता पावलेलं मात्र अजून दिसत नाही. अजूनही प्रेम केलं म्हणजे ''लग्न कधी करताय'' असं विचारणारे किंवा जातीबाहेर किंवा स्टेटसमध्ये न बसणारा जोडीदार निवडला तर जीव घेणारे बाप आणि खाप अस्तित्वात आहेतच. हेटरोसेक्श्युअल असो वा होमोसेक्श्युअल, मोनोगॅमीस्ट असो वा पॉलीगॅमीस्ट "तुझं माझ्यावर प्रेम होतं, आता ते नाही आहे, त्याच्यानं काही फरक पडत नाही. जसं ते आधी नसताना एकदम झालं तसंच ते खूप जास्त असताना एकदम संपून गेलं. कदाचित थोडा वेळ दिला तर ते परत येईल. पण म्हणून मला तुला बांधून ठेवायची गरज नाही." असे उद्गार काढणारं जोडपं बघायची मला खूप इच्छा आहे.
शहरात वाहनं वापरणा-या लोकांना लेनचं महत्व वेगळं सांगायला नको. आपण ज्या लेनमधून चाललो आहोत त्या लेनचा वेग आणि आजूबाजूच्या लेन्सचा अंदाज घेऊन आपली पोझिशन आपण पाळतो. प्रेम या संकल्पनेच्या बाबतीत ही वाहतुकीच्या लॉजीकची तुलना कदाचित योग्य ठरू शकेल. प्रेम ही सतत वाहत राहणा-या वाहतुकीसारखी एक व्यवस्था असावी, ज्यात समोर खड्डा आला तरी हळूहळू ब्रेक मारावा, अन्यथा पाठीमागे असलेल्या सर्व वाहतुकीला आपण जोखमीत टाकू आणि स्वतःचाही अपघात करवून घेऊ अशा पद्धतीचं तत्त्व आपण अवलंबतो. प्रेम केलेली व्यक्ती जरी आता आपलं प्रेम आकर्षित करायला कमी पडत असली किंवा आपल्याला तिच्याविषयीचं प्रेम आता वाटत नसलं तरी आपल्या सहवासामुळे ज्या काही इतर गोष्टी परिणामानं आपल्याला मिळाल्या आहेत त्या गमावण्याच्या मनःस्थितीत आपण नसतो. यात त्या त्या व्यक्तींचे लागेबांधे, नेटवर्क, भावना, अपत्यं असतील तर त्या जबाबदाऱ्या, छोटं मोठं सुख, आर्थिक मदत इ. गोष्टी येतात.
तुम्ही दुसऱ्याला जितकं प्रेम द्याल तितकंच प्रेम तुम्हाला मिळेल या उक्तीला गांभीर्यानं घ्यायचं ठरवलं तर प्रेम ही देण्याघेण्याची वस्तू/क्रिया आहे हे मान्य करावं लागेल. अव्यक्त प्रेम किंवा प्लॅटॉनिक प्रेम हा विषय या लेखाच्या कक्षेत येत नाही. कारण तिथे प्रेम करणारा आणि मिळवणारा यांच्यात त्याप्रकारची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे उपभोग्य वस्तू/क्रिया जशी कार्य साध्य झाल्यावर निरुपयोगी ठरते तसंच प्रेमदेखील एका ठराविक काळानंतर तसं होऊ शकतं. जीवनभर पुरून उरेल असं एकमेव प्रेम मिळणं दुरापास्त असतं जसं उदाहरणार्थ आपल्याला एकच मोबाईल वापरणं अशक्य असतं. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती जशी आपल्यासाठी एक ऑप्शन असते तसेच आपणही तिच्यासाठी एक ऑप्शन असतो हे मनात स्वच्छ झालं की प्रेम टिकवण्यासाठी केला जाणारा निरर्थक आटापिटा टळेल आणि ते सहज, स्वाभाविक होऊ शकेल. त्याला जसा एक गौरवास्पद निश्चित जन्म असतो तसाच गौरवास्पद मृत्यूदेखील असेल. एरव्ही तत्त्व आणि त्याचं व्यावहारिक उपयोजन यामध्ये तफावत असते आणि त्याला आपण सचोटी म्हणतो असं सगळेच समजून असतात. पण प्रेमाविषयी आपल्याला विशुद्ध, दृढ नीती प्रमोट करायची असते. ते एक अतिशय मानवी मूल्य आहे आणि ते क्षणभंगुर असलं म्हणून काही ते कुरूप होत नाही ही गोष्ट आपल्याला आपल्या ओ. एस. (ऑपरेटिंग सिस्टीम) प्रमाणेच अपग्रेड करून घ्यायला हवी.
(4 votes)
- प्रतिक्रिया पाठवा
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
“People who are not in love fail to understand how an intelligent man can suffer because of a very ordinary woman. This is like being surprised that anyone should be stricken with cholera because of a creature so insignificant as the comma bacillus.”
- मार्सेल प्रूस्त (फ्रेंच लेखक)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वरचे आक्षेप काहि प्रमाणात योग्य असले तरी माझ्या बाबतीत ती पश्चतबुद्धी आहे. लेख वाचताना काहितरी निसटल्यासारखं वाटत होतं पण ते इतरांइतकं पकडु शकलो नाही.. तेव्हा माझ्यापुरता हा लेख आवडला.. अधिक घट्टा बांधला असता तर एक वेगळी मजा आली असती हे ही खरं..
-------
कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल.
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे लॉजिकल वाटले नाही. नसताना एकदम झालं हे ठीक. पण असताना संपण्यासाठी प्रेम ही किलोत किंवा लीटरात मोजायची बाब नाही.
ते असलं, तरीही काही प्रश्न येतात समोर.
ते नसलं, तरीही काही दुसरे प्रश्न येतातच समोर.
एकूण प्रश्नांना पर्याय नाही.
त्यात छुपा 'उपयुक्ततावाद' असेल तर मात्र माझी सहमती क्षणभंगूर समजावी
अब्द शब्द