Thursday, January 3, 2013

मिडनाईट इंटरल्यूड

ओंकार कुलकर्णी आणि नेहा जोशी यांची ही शॉर्ट फिल्म काल पाहिली. शहरात एकटा राहणारा तरुण आयटी तज्ञ आणि त्याची एक मध्यरात्र – असा विषय. मनोव्यापारांचे तंत्र या पद्धतीने त्याचा हा जीवनतुकडा त्याच्या एकूण जगण्याचाच वेध घेतो. एकच खोली, बियरच्या बाटल्या खाली पाडून फोडणारे उंदीर, नळाला पाणी नसणे, संडासात गाणे म्हणावे तरी शेजाऱ्याला त्रास, दुरावलेली प्रेयसी, संवाद नसणे, एकाकीपणा – हा सगळा नमूना आपल्यापुढे आधुनिक झगमगीतपणाचा फील देत सादर होतो. प्रत्येक गोष्ट अशी खरेच घडली का, हा प्रश्न नाही. त्याने हाताची नस कापून घेणे हे मनात साठत चाललेल्या हिंसेचेही सूचन करते. अशा जगण्याची हीच होणार परिणती – असे वाक्य आपल्या डोक्यात येतानाच – आपलेही असेच क्रियाप्रतिक्रियांचेच आयुष्य ताबाहीन चाललेले नाही का – हा प्रश्न आपल्या डोक्यात येतो. आजच्या जगण्याचे दर्शन घडवत काही मूलभूत प्रश्न ही फिल्म समोर आणते, हे महत्त्वाचे आहे. मधेच “ इतिहास शिका, इतिहासातून शहाणपण येते “ अशा अर्थाच्या काही वाक्यांचे आवर्तन आहे. ते तर अनुभवातून शिकण्याच्या कल्पनेचीच खिल्ली उडवणारे आहे ! याच संदर्भात, त्याची पुस्तके जाळण्याची कॄतीही बरेच सांगून जाते. जमल्यास जरूर पाहा ही फिल्म. थोडक्या वेळात उत्तम, अर्थपूर्ण अभिव्यक्ती !

- @chandrakant deshpande

No comments: